March 13, 2026

जिल्ह्यातील गॅस एजन्सी धारकांसाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

कोल्हापूर दि. 12 (जिमाका) : आखाती प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना घरगुती एलपीजी गॅसचा सुरळीत, पारदर्शक व नियंत्रित पुरवठा होण्यासाठी व कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक/गॅस एजन्सी धारकांना पुढील सूचना देण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त होम डिलिव्हरी पद्धतीनेच करावा. ग्राहकांना गोडाऊन अथवा एजन्सीवरून थेट सिलेंडर वितरण करू नये. तसेच सिंगल गॅस सिलिंडर कनेक्शन धारकांना प्राधान्य देण्यात यावे. गॅस सिलेंडरचे वितरण हे ऑनलाईन बुकींग झालेल्या ग्राहकांनाच करण्यात यावे तसेच नोंदणीकृत ग्राहकांनाच नियमानुसार पुरवठा करण्यात यावा, अनधिकृत ग्राहकांना किंवा नियमबाह्य पद्धतीने सिलेंडर वितरण करू नये. कोणत्याही ग्राहकास अनावश्यक साठा करण्यासाठी एकापेक्षा जास्त सिलेंडर देणे टाळावे व शासनाच्या प्रचलित नियमांनुसारच वितरण करावे. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखून डिलिव्हरीची योग्य नोंद (रजिस्टर / ऑनलाईन प्रणालीमध्ये) ठेवणे बंधनकारक राहील. नागरिकांनी अनावश्यक साठा करणे टाळावे यासाठी वितरकांनी ग्राहकांमध्ये योग्य जनजागृती करावी. जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू (PNG) चा पुरवठा होत आहे, त्या ग्राहकांना घरगुती एलपीजी गॅसच्या सिलिंडरच्या माध्यमातून होणारा पुरवठा युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात यावा.

प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर कोणत्या बुकींग तारखेपर्यंत गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करण्यात येणार आहे याचे निर्देश देण्यात येणारे फलक लावावेत. प्रत्येक गॅस एजन्सी कार्यालय पूर्ण वेळ उघडे राहील याची दक्षता घ्यावी. सर्व संबंधित गॅस एजन्सींनी नागरिकांना संपर्कासाठी आपला दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावा.
कोणत्याही प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण करणे, साठेबाजी करणे, जादा दराने विक्री करणे किंवा शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करताना आढळल्यास संबंधित वितरकांविरुद्ध द्रवरूप पेट्रोलियम गॅस (पुरवठा व वितरण विनियमन) आदेश 2000 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिला.

Written by

Suresh Shankar Jadhav

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION