नाशिक येथे ४० वर्षांनंतर भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा जल्लोष
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- नाशिक शहरात तब्बल ४० वर्षांनंतर प्रथमच भव्यदिव्य स्वरूपातील “तपोवन हनुमान राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२६ ही स्पर्धा दि. २ एप्रिल २०२६ हनुमान जयंतीनिमित्त, मुक्तिधाम मागे मनपा मैदान, नाशिक येथे आयोजित करण्यात येत असून यानिमित्त झालेल्या नियोजन बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
ही बैठक माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच महाराष्ट्र केसरी गोरख नाना बलकवडे आणि कुस्ती क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तमराव दळवी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तमाम कुस्तीप्रेमी व पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून बैठक उत्साहात संपन्न झाली.
नाशिकमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर कुस्ती स्पर्धा होत असल्याने बक्षीस रक्कमेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विजयी कुस्तीगीरांना
पहिले बक्षीस १ लाख १ हजार रुपये व मानाची गदा.
दुसरे बक्षीस ५१ हजार रुपये.
तिसरे बक्षीस २५ हजार रुपये.
तसेच महिला गटासाठी
पहिले बक्षीस ३१ हजार रुपये करण्यात आले आहे.
स्वागताध्यक्ष रोहन देशपांडे यांनी यावेळी सांगितले की, स्पर्धेसाठी कोणत्याही सुविधांमध्ये कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही. राज्यभरातून तसेच राज्याबाहेरून येणाऱ्या सर्व कुस्तीपटूंना ये-जा खर्चासह मानधन व निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्वांनी उत्साहाने सहभाग घ्यावा आणि खेळाचा उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
या बैठकीस व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती महाराज आहेर, अनिल अण्णा ढेरिंगे, सुधाकर जाधव, विजय जाधव, कुस्तीगीर संघाचे कोषाध्यक्ष मधुकर वाघ, पै. प्रवीण पाळदे, ज्येष्ठ कुस्तीपटू रवींद्र मोरे, उत्तम आरोटे, श्याम गोहाड, शेखर फडताळे, चिराग शर्मा, मसूद जिलानी, बाळासाहेब वाघ, दशरथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
नाशिक शहरात होणारी ही कुस्ती स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून युवकांमधील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी आणि हनुमान जयंतीचा उत्सव देशभर गाजवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्वागत समितीच्या वतीने सर्व नागरिकांना या भव्य स्पर्धेला उपस्थित राहून कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*Devashish Govind Tokekar*