April 4, 2026

महानत्यागी बाबा जुमदेवजी, श्रद्धा, त्याग आणि मानवतेचा उज्ज्वल मार्ग १०५ वी जयंती दिन विशेष

महानत्यागी बाबा जुमदेवजी, श्रद्धा, त्याग आणि मानवतेचा उज्ज्वल मार्ग

१०५ वी जयंती दिन विशेष

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- महानत्यागी बाबा जुमदेवजी ( ३ एप्रिल १९२१ ते ३ ऑक्टोबर १९९६ ) हे नागपूरच्या भूमीत जन्मलेले एक अद्वितीय समाजसुधारक आणि मानव धर्माचे संस्थापक होते. अत्यंत गरीब विणकर कुटुंबात जन्म असूनही त्यांनी ‘परमात्मा एक’ हा साधा पण प्रभावी संदेश देत हजारो लोकांचे जीवन बदलले.

*जन्म व प्रारंभिक संघर्ष*

३ एप्रिल १९२१ ला टिमकी, नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असल्याने त्यांचे शिक्षण चौधीपर्यंतच झाले. लहान वयातच त्यांनी विणकाम करत कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. पण या संघर्षातूनच त्यांच्यात कणखरपणा, प्रामाणिकपणा आणि परमेश्वरावर दृढ विश्वास निर्माण झाला.

*परमेश्वरी मार्गाची प्राप्ती*

कुटुंबावर आलेल्या संकटांच्या काळात त्यांनी अथक साधना, श्रद्धा आणि धैर्याच्या बळावर परमेश्वरी शक्तीचा अनुभव घेतला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कठीण साधना पूर्ण केली आणि ‘एकच परमात्मा’ हा सत्य मार्ग लोकांसमोर मांडला. हा मार्ग अंधश्रद्धेविरहित, साधा आणि नि:स्वार्थ होता.

*मानव धर्माची स्थापना व कार्य*

बाबांनी ‘मानव धर्म’ स्थापन करून समाजातील व्यसन, अंधश्रद्धा आणि दुःख दूर करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांनी लोकांना सांगितले की, नि:स्वार्थ सेवा करा, व्यसनमुक्त जीवन जगा, सर्वांना समानतेने वागवा आज त्यांच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने लाखो लोकांनी व्यसनांचा त्याग केला आणि सन्मार्ग स्वीकारला.

*त्याग आणि प्रेरणा*

!बाबांचे संपूर्ण जीवन हे त्याग, सेवा आणि समर्पण यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही तर जे मिळाले ते समाजासाठी अर्पण केले. म्हणूनच त्यांना महानत्यागी’ ही उपाधी मिळाली. आजच्या तरुणांनी बाबांच्या जीवनातून तीन गोष्टी शिकायला हव्यात (१) श्रद्धा आणि आत्मविश्वास (२) कष्ट आणि प्रामाणिकपणा (३) समाजासाठी योगदान
आज मोबाईल, स्पर्धा आणि भौतिक सुखांच्या युगात, माणुसकी टिकवून ठेवणे हीच खरी साधना आहे. दरवर्षी ३ एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सेवक समाजसेवा, व्यसनमुक्ती अभियान आणि मानवतेचा संदेश देतात हीच बाबांना खरी आदरांजली ठरते. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी दाखवलेला मार्ग हा केवळ धार्मिक नाही, तर मानवतेचा मार्ग आहे. त्यांच्या विचारांचा स्वीकार करूनच आपण एक सुसंस्कृत, व्यसनमुक्त आणि सुसंवादी समाज घडवू शकतो.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०५ वी जयंतीनिमित्त परमात्मा एक मानवता एक’ हीच त्यांना खरी अभिवादन आणि पुढील पिढीसाठी दीपस्तंभ ठरेल अशी अपेक्षा आहे.
*Devashish Govind Tokekar*

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION