March 28, 2026

श्रीरामपूर हादरले! रामनवमीच्या मिरवणुकीवर मशिदीसमोर दगडफेक; परिसरात तणावपूर्ण शांतता

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे. २६ मार्च २०२६ रोजी दुपारी वार्ड क्र. २ मधील मशिदीसमोरून मिरवणूक जात असताना अज्ञातांकडून झालेल्या दगडफेकीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेत काही भाविक जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम नवमीनिमित्त गोंधवणी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी ३:३० च्या सुमारास ही मिरवणूक वार्ड क्रमांक २ मधील मशिदीजवळ पोहोचली असता, अचानक काही समाजकंटकांनी मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांची मोठी धावपळ उडाली. या दगडफेकीत २ ते ३ जण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तातडीने अतिरिक्त पोलीस कुमक पाचारण करण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. “नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखावी,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्यांवरही कडक नजर ठेवली जात आहे. सध्या श्रीरामपूरमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलीस संचलन करून नागरिकांना सुरक्षिततेची खात्री देत आहेत.

Written by

BALASAHEB RAJENDRA GANGURDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

Marketing Managed by - KARIYO TECH SOLUTIONS

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION