June 10, 2026

बारावीनंतर पुढे काय? विषयावरील भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

बारावीनंतर पुढे काय? विषयावरील भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

पुणे | प्रतिनिधी अमर पठारे | दि. १ जून २०२६

आजच्या स्पर्धात्मक युगात बारावीनंतर योग्य करिअरची निवड करणे हे विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊन योग्य दिशा मिळावी या उद्देशाने एस. पी. इंटरनॅशनल येथे “बारावीनंतर पुढे काय?” या विषयावर भव्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक डॉ. राजेश्वर हेंद्रे यांनी विद्यार्थ्यांना बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक शाखा, व्यावसायिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, कौशल्याधारित शिक्षण, उद्योजकता आणि रोजगाराच्या नव्या संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळविण्यापेक्षा स्वतःचे कौशल्य विकसित करून बदलत्या काळानुसार स्वतःला सक्षम बनविण्याचे आवाहन केले.

डॉ. हेंद्रे यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे देत करिअर निवडीसाठी आत्मपरीक्षण, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून पालकांनाही आपल्या पाल्यांच्या भविष्यासंदर्भात मौल्यवान मार्गदर्शन मिळाले.

याच कार्यक्रमात युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री. रविंद्रजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. युवकांनी समाजाभिमुख कार्यात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, कायद्याचे पालन करावे, नागरिक म्हणून आपली कर्तव्ये समजून घ्यावीत तसेच राष्ट्रहित आणि समाजहितासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास माननीय डॉ. राजेश्वर हेंद्रे सर (राष्ट्रीय उपाध्यक्ष), माननीय श्री. अनिल रेळेकर (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र पोलीस मित्र) तसेच श्री. अमर सोकांडे सर (पुणे युवा शहराध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले तसेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या मार्गदर्शन शिबिरास बारावी उत्तीर्ण झालेले सुमारे १०० विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत विविध विषयांवर प्रश्न विचारले. पालकांनी देखील अशा प्रकारच्या मार्गदर्शन उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, योग्य करिअर निवडीसाठी आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे मार्गदर्शन शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे तसेच युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.

AMAR SHIVAJI PATARE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION