कोल्हापूर, दि. २७ : प्रतिनिधी सुरेश जाधव
मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेनंतर अद्ययावत आणि दोषमुक्त मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता तटस्थ, पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने ही प्रक्रिया राबवावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना नष्टे तसेच जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पुनरिक्षण मोहिमेची माहिती दिली.
या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे, स्थलांतरित व दुबार नावे वगळणे, मृत व्यक्तींची नावे कमी करणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे हा आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत गणना अर्जांची छपाई, बीएलओ प्रशिक्षण, घरभेटीद्वारे प्रपत्रांचे वाटप व संकलन ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ३ हजार ४५० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरभेटीद्वारे पडताळणी करणार आहेत. विविध राजकीय पक्षांकडून ३ हजार ९२८ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नियुक्त करण्यात आले असून, या संख्येत आणखी वाढ करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या.
राज्यात सध्या ७२.०४ टक्के मतदार मॅपिंग पूर्ण झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यात ८०.९१ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे.
बैठकीपूर्वी एस. चोकलिंगम यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासोबत कायदा व सुव्यवस्था आणि पुनरिक्षण कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन कामाच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांनी गणना प्रपत्रांचे वाटप आणि संकलन करताना संबंधित कुटुंबातील व्यक्तीची स्वाक्षरी घेणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक घर, झोपडी किंवा निवासस्थानाला स्वतंत्र ओळख क्रमांक देणे, संपर्क क्रमांक व संपूर्ण पत्ता नोंदविणे यावरही भर देण्यात आला.
झोपडपट्ट्या, दुर्गम भाग तसेच तृतीयपंथीयांसह सर्व घटकांतील नागरिकांचा मतदार यादीत समावेश सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे अधिकार मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मतदार मॅपिंगदरम्यान संबंधित मतदार आढळून न आल्यास त्याची माहिती बीएलएला देऊन स्वाक्षरीसह अहवाल तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रस्तावित वगळलेल्या नावांच्या याद्या सार्वजनिक करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
“एकही पात्र मतदार वगळला जाऊ नये आणि एकही अपात्र व्यक्ती यादीत राहू नये,” अशी भूमिका प्रशासनाने ठेवावी, असे त्यांनी स्पष्ट केले. तयार होणारी मतदार यादी ही केवळ सुधारित नसून संपूर्ण नव्या स्वरूपातील असेल, असेही त्यांनी सांगितले.
एस.आय.आर. वेळापत्रक :
• २० ते २९ जून २०२६ – गणना अर्जांची छपाई व बीएलओ प्रशिक्षण
• ३० जून ते २९ जुलै २०२६ – घरभेटीद्वारे प्रपत्रांचे वाटप व संकलन
• ५ ऑगस्ट २०२६ – प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
• ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ – दावे व हरकती स्वीकारल्या जातील
• ३ ऑक्टोबर २०२६ – दावे व हरकतींचा निपटारा
• ७ ऑक्टोबर २०२६ – अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध