April 7, 2026

8 ते 25 एप्रिलदरम्यान अमृत परिवार सर्वेक्षण अभियान : अमृत संस्था, महाराष्ट्र शासन

कोल्हापूर, दि. 7 (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवती व इतर उमेदवारांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे. ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांच्या उन्नतीसाठी अमृत संस्था कार्यरत आहे.

अमृतच्या लक्षित गटामध्ये सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी आणि कोमटी/वैश्य अशा 25 जातींचा समावेश आहे. सर्वेक्षणानंतर या गटात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन तसेच उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक व्याज परतावा योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लक्षित गटातील कुटुंबांची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, स्थानिक संसाधने, उपलब्ध कौशल्ये आणि आवडीनुसार नवीन योजना तयार करण्यासाठी अमृत परिवार सर्वेक्षण अभियान 8 ते 25 एप्रिलदरम्यान महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास हा कालावधी वाढविण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणाद्वारे जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती पोहोचविण्याबरोबरच सर्वांगीण विकासासाठी आणखी कोणत्या उपाययोजना अपेक्षित आहेत, याबाबत संबंधितांची मते जाणून घेऊन नवीन योजना तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे. या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्षित गटाशी संपर्क साधणार असून विविध सामाजिक संस्था, संघटना व मंडळांमधील प्रतिनिधींचीही माहिती घेतली जाणार आहे. लक्षित गटातील कुटुंबे, संस्था, संघटना व मंडळांनी अमृतच्या जिल्हा व्यवस्थापक किंवा विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून आपल्या परिवाराची अथवा संस्थेची नोंदणी करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले.

Written by

Suresh Shankar Jadhav

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION