बिलोलीच्या स्वच्छतेचा बोजवारा : नगरपरिषदेच्या ‘कचरा संस्कृती’मुळे शहर रोगराई च्या विळख्यात
पावसाळ्याच्या उंबरठ्यावर बिलोलीतील स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
बिलोली :
स्वच्छतेच्या नावाखाली मोठी आश्वासने देणाऱ्या बिलोली नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, गांधीनगरसह अनेक परिसरांतील नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
शहरातील अनेक भागांत कचरा साचलेला असून, काही ठिकाणचे नाले प्लास्टिकच्या बाटल्या व इतर टाकाऊ वस्तूंमुळे तुंबल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपरिषदेच्या कचरा संकलन गाडीचे नियमित वेळापत्रक विस्कळीत झाले असून काही भागांत चार-चार दिवसांनी गाडी येत आहे. तसेच अनेकदा सायरन न वाजवल्याने नागरिकांना गाडी आल्याची माहिती मिळत नसल्याची तक्रार आहे. पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे काही नागरिकांना घरगुती कचरा रिकाम्या प्लॉटवर टाकावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शहरातील काही भागांत दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे.
या समस्येचा परिणाम स्वच्छता कर्मचाऱ्यांवरही होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. काही नागरिकांच्या मते, कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य, जसे की मास्क व हॅन्ड ग्लोज, पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत स्वच्छता निरीक्षकांशी संपर्क साधला असता, त्यांनी टेंडर प्रक्रिया पूर्ण न होणे आणि मनुष्यबळाची कमतरता ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले. मात्र, पावसाळा जवळ येत असताना साचलेला कचरा आणि तुंबलेले नाले यामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढू शकतो, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांनी प्रशासनाकडे रिकामे प्लॉट स्वच्छ करणे, नाल्यांची साफसफाई करणे आणि कचरा संकलनाची व्यवस्था नियमित करण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.