बिलोली (प्रतिनिधी):
बिलोली तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाचा मोठा भांडाफोड महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ अंदाज समितीच्या पाहणी दौऱ्यात झाला. नियमांना पायदळी तुडवत सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काल पार पडलेल्या या दौऱ्यात समितीचे अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर यांच्यासह सदस्य आ. कैलास पाटील, आ. कृष्णा खोपडे, आ. हेमंत पाटील, आ. शेखर निकम आणि आ. किशोर आप्पा पाटील उपस्थित होते. यावेळी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार गजानन शिंदे तसेच पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔴 सगरोळी घाटावर धक्कादायक वास्तव
समितीने अचानक सगरोळी येथील रेती घाटाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या साठवलेली रेती आढळून आली. नियमबाह्य उत्खनन आणि वाहतूक पाहून समितीने तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर ताशेरे ओढले.
⚠️ येसगी घाटावर जेसीबी आढळल्याने खळबळ
यानंतर समिती येसगी येथील शासकीय रेती घाटावर पोहोचली असता, उत्खननासाठी वापरली जाणारी जेसीबी मशीन आढळली.
“जेसीबीने उत्खनन हा कायद्याने गुन्हा असताना हे मशीन इथे काय करत आहेत?” असा थेट सवाल अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी अधिकाऱ्यांना केला. मात्र अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तर नव्हते. यावर समितीने तात्काळ जेसीबी जप्त करण्याचे आदेश दिले.
🚧 नदीचा प्रवाह अडवून अवैध रॅम्प
पाहणीदरम्यान नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवून रेती वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला अवैध रॅम्प आढळून आला. या गंभीर प्रकारावर समिती संतप्त झाली. “नदीचा प्रवाह अडवून असा रॅम्प कसा बनवला?” असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी केली.
🔥 अधिकाऱ्यांवर थेट आरोप
यावेळी अध्यक्ष खोतकर यांनी तहसीलदार गजानन शिंदे यांना उद्देशून,
“तुम्ही ठेकेदारांचा ठेका घेतलाय का?” असा थेट सवाल करत प्रशासनावर गंभीर आरोप केले.
📌 समितीच्या निरीक्षणातील प्रमुख मुद्दे
नियमापेक्षा जास्त खोल उत्खनन
जेसीबीद्वारे दिवस-रात्र काम
क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक
मॉनिटरिंग यंत्रणेचा अभाव
ठेकेदारांवर नियंत्रण नसणे
या सर्व प्रकारांवरून संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
⚡ जीवघेणा प्रकार उघड
पाहणीदरम्यान नदीकाठावर विजेची जिवंत तार टाकून अवैध ट्रक थांबवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे मानवी जीविताला गंभीर धोका निर्माण होत असल्याने समितीने ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
🏛️ राजकीय आरोपही चर्चेत
दरम्यान, स्थानिक पातळीवरून हा ठेका एका बलाढ्य मंत्र्याच्या निकटवर्तीयाचा असल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.
❓ मोठा प्रश्न कायम
विधिमंडळ समितीने दिलेले आदेश प्रत्यक्षात अंमलात येणार का?
की हा दौरा देखील केवळ औपचारिक ठरणार?
पूर्वीप्रमाणेच हा मुद्दा दाबला जाणार का?
याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.