*जनगणनेचे कामं अचूक पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ.आशिया*…
नगर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) दि.६ : आगामी जनगणना-२०२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तयारीला वेग आला असून यावेळची जनगणना पूर्णपणे कागदरहित व डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाद्वारे तांत्रिक बाबी सखोल समजून घेऊन जनगणनेचे कार्य अचूक व वेळेत पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
अहिल्यानगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे जनगणनेचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण सुरू आहे.जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी प्रशिक्षण केंद्राला भेट देत तयारीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन केले.
जनगणनेचे काम करताना कोणतीही त्रुटी राहू नये व प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी यावर त्यांनी विशेष भर दिला. कर्मचाऱ्यांनी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करावा. तसेच डेटा संकलनाची पद्धत नीट समजून घेऊन फिल्डवर काम करताना येणाऱ्या अडचणींवर तत्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.या मोहिमेअंतर्गत ६ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत तीन टप्प्यांत अधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे.
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे,निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते,तहसीलदार नागेश गायकवाड, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय महादेव साळवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, मास्टर ट्रेनर्स व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*