धडाकेबाज कारवाई! कुंडलवाडी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह १२ जणांवर गुन्हा दाखल
अमरदीप दगडे
कुंडलवाडी (प्रतिनिधी):
कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली आहे. मौजे पिंपळगाव (कु) शिवारात सुरू असलेल्या ‘तिर्रट’ नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी छापा टाकून रोख रकमेसह चार दुचाकी असा एकूण २ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
👉 *गुप्त माहितीच्या आधारे कारवाई* :
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पिंपळगाव (कु) शिवारात काही इसम पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून रविवारी सायंकाळी १८.०० वाजताच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
👉 *मुद्देमाल आणि आरोपी* :
पोलिसांनी छापा टाकला असता, घटनास्थळावरून ४ इसमांना ताब्यात घेण्यात आले, तर अंधाराचा फायदा घेऊन ८ इसम पळून जाण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून:
नगदी रक्कम: २४,४००/- रुपये
वाहने: ०४ मोटारसायकल (किंमत २ लाख १० हजार रुपये)
इतर: ४० बदक छाप पत्ते आणि जुगाराचे साहित्य
असा एकूण ०२ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व १२ आरोपींविरुद्ध ‘महाराष्ट्र जुगार कायदा’ कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
👉 *या पथकाने केली कामगिरी* :
ही यशस्वी कारवाई पोलीस स्टेशनचे इन्चार्ज तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मांजरमकर आणि त्यांच्या टीमने अत्यंत चाणाक्षपणे पार पाडली.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, गुन्हेगारांनी अशा कृत्यांपासून दूर राहावे, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.