“लस पूर्णतः सुरक्षित; अफवांवर विश्वास ठेवू नका, मुलींचे लसीकरण करा”
अमरदीप दगडे (जिल्हा प्रतिनिधी)नांदेड दि १८ मार्च:
जिल्ह्यात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी बोलताना कावली म्हणाल्या की, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा गंभीर आजार असून त्यावर प्रभावी उपाय म्हणून एचपीव्ही लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. ही लस पूर्णतः सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पालकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे वेळेत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जनजागृतीवर भर
लसीकरणाचा व्यापक प्रसार करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी जनजागृती मोहिमा राबवाव्यात, असे निर्देश देताना त्यांनी पुढील बाबींवर विशेष भर दिला:
शाळा व शिक्षकांच्या माध्यमातून पात्र मुलींपर्यंत पोहोचणे
महिलांच्या ग्रामसभा, माता बैठक, महिला व युवा मंडळांच्या सहभागातून जनजागृती
सरपंच व स्थानिक नेतृत्वाच्या सहकार्याने पालकांमध्ये विश्वास निर्माण करणे
लसीकरण सुरक्षित आणि प्रभावी
कावली यांनी स्पष्ट केले की, एचपीव्ही लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत. या लसीमुळे मुलींचे आरोग्य सुरक्षित राहून त्यांचे भविष्य अधिक निरोगी व उज्ज्वल होणार आहे. आरोग्य विभागाने आयईसी उपक्रमांद्वारे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा
या बैठकीत इतर राष्ट्रीय आरोग्य योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये:
कुष्ठरोग व क्षयरोग (TB) निर्मूलन मोहीम
पॅलिएटिव्ह केअर (सुश्रुषा सेवा)
आयुष्मान भारत अंतर्गत गोल्डन कार्ड वितरण
NCD व RCH कार्यक्रम
विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, सह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, सहसंचालक आरोग्य सेवा डॉ. बालन, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, मलेरिया अधिकारी डॉ. चव्हाण, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.