वानाडोंगरी परिसरात धक्कादायक प्रकार*
*“धमकीनंतर थेट हल्ला ?” कॅप्टन गोपाल ठाकरे यांना शहाकार कडून मारहाण, मोबाईल व सोन्याची चेन हिसकावली*
हिंगणा : सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल तुकाराम ठाकरे यांच्यावर गंभीर मारहाण व लूटमारीचा प्रकार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास ठाकरे हे साई मंदिरकडून आपल्या घरी मोटारसायकलने जात असताना ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश भाऊराव शहाकार, सागर सतीश शहाकार, स्वप्नील सतीश शहाकार व इतर काही जण त्यांच्या घराजवळ बसले होते. परिसरात नालीचे काम सुरू असल्यामुळे ठाकरे यांची गाडी हळू होती. याच वेळी आरोपींनी “आज ५ तारीख आहे, आता कुठे पळतोस” अशी शिवीगाळ करत त्यांना थांबवले. ठाकरे यांनी मोबाईल काढून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला असता, सर्व आरोपींनी त्यांना पकडून खाली पाडले.
या घटनेत ठाकरे यांना जबर मारहाण करण्यात आली असून, त्यांचा अंदाजे २२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून फोडण्यात आला. तसेच गळ्यातील सुमारे २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि सुमारे १२ हजार रुपये किंमतीचा चष्मा देखील जबरदस्तीने काढून घेण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर ठाकरे यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशन, नागपूर येथे धाव घेतली. पोलिसांनी त्यांना आधीची तक्रार प्रत आणण्यास सांगितले असून, सध्या ते अधिकृत तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, निवडणुकीतील वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक चर्चा आहे.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नुकताच एका SRPF पोलिसाचा खून, त्यानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घराला आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न, आणि आता सेवानिवृत्त सैनिकावर हल्ला करून लूट – या सलग घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. देशसेवा करणारेच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात पोलिस प्रशासन नेमकी कोणती ठोस कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*