विलास केजरकर, भंडारा
भंडारा:- येथील जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, गृह अर्थशास्त्र विभाग, रसायनशास्त्र विभाग, शारीरिक शिक्षण, प्राणीशास्त्र विभाग, वाणिज्य विभाग आणि संगणक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम, गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजया कन्नाके, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनीकर, डॉ. श्याम डफरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध प्रकारचे पापड व शेवया तयार करण्याच्या पारंपारिक पद्धतींचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात पारंपारिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पापड व शेवयांची वाढती मागणी व या क्षेत्रातील स्वयंरोजगाराच्या संधी लक्षात घेऊन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
विद्यार्थ्यांना पापड व शेवया तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, त्याचे प्रमाण व पद्धती याचे सखोल प्रशिक्षण सौ. गौरी ब्राह्मणकर यांनी दिले. तसेच उद्योग उभारणी, विपणन तंत्र आणि आर्थिक नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पदार्थ स्वतः बनवून पाहिले.
या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना लघु उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहित करणे हा होता. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणासोबतच घरबसल्या लघुउद्योग सुरू करून आत्मनिर्भर होऊ शकतात. तसेच, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत प्रभारी प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण गोसेकर, डॉ. भीमराव पवार, डॉ. विना महाजन, प्रा. प्रशांत वालदेव, डॉ. संगिता कटरे, डॉ. ममता राऊत, डॉ. विशाखा वाघ, डॉ. रोमी बिष्ट, डॉ. गिरीधरलाल तिवारी, डॉ. भावना राय, डॉ. वैशाली लोणकर, डॉ. सबा नसीम, प्रा. प्रियांका शर्मा, डॉ. जयालक्ष्मी पाटील, डॉ. निखत शेख, शारदा कुलवंते यांनी मोलाचे सहकार्य केले.