*दूध भेसळ प्रकरणाला नवे वळण; संतोष धसाळच्या घरावर पुन्हा धाड*, *अक्षय निकम पोलिसांच्या* *ताब्यात*
*दूध भेसळ प्रकरणाला नवे वळण; संतोष धसाळच्या घरावर पुन्हा धाड* , *अक्षय निकम पोलिसांच्या* *ताब्यात*
दूध भेसळ प्रकरणात तांदूळवाडी येथील संतोष धसाळ याचे नाव पुढे आल्यानंतर या प्रकरणाने आता नवे वळण घेतल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धसाळ याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा पोलिसांचे पथक धसाळच्या घरावर दाखल झाले आणि सविस्तर झाडाझडती घेतली. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती नेमके कोणते पुरावे लागले याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आरडगाव येथील अक्षय निकम या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे प्रकरण अधिकच गूढ बनले असून गावकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. अक्षय निकम हा गेल्या काही वर्षांपासून संतोष धसाळ याच्या घरी काम करत असल्याची माहिती समोर येत असून, धसाळच्या कथित गैरव्यवहारांमध्ये त्याचा काही सहभाग असावा का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात संतोष धसाळ यामागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासल्यास अनेक धागेदोरे समोर येऊ शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. ही तपासणी नेमकी कितपत होते आणि त्यातून कोणती माहिती पुढे येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी नेवासा फाटा परिसरातील एका कथित दूध भेसळखोराशी संतोष धसाळचे संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर ऐकू येत होती. मात्र आता धसाळकडे काम करणारा अक्षय निकम पोलिसांच्या ताब्यात गेल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत संतोष धसाळची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याचे सांगितले जाते. मात्र अल्पावधीतच तो कोट्यधीश कसा झाला, हा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक अत्यंत जबाबदारीने आणि काटेकोरपणे करत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारची तडजोड न करता कायदेशीर चौकटीत राहून तपास सुरू असल्याने पोलिसांच्या कामाचे कौतुकही होत आहे.
या सर्व घडामोडींमुळे संतोष धसाळ याच्यावर दूध भेसळ प्रकरणात ठोस आरोप सिद्ध होणार का, याबाबत तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार चर्चा रंगत आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अक्षय निकमकडून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“दूधात भेसळ झाली की नाही हे तपासात स्पष्ट होईलच; पण या सगळ्या प्रकरणामागचा खरा सूत्रधार कोण, याचीच आता गावात कुजबुज सुरू झाली आहे.”
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
District Reporter