मोठी कारवाई: कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख निलंबित .
आपल्या कर्तव्यात वारंवार कसूर करणे आणि नागरिकांकडून प्राप्त झालेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारींची दखल घेत, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांना तातडीने निलंबित केले आहे. ७ एप्रिल रोजी शासनाचे कार्यासन अधिकारी यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले असून, या कारवाईमुळे संपूर्ण आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा नियोजन समितीमार्फत आरोग्य विभागाला कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. मात्र, हा निधी नियोजित वेळेत खर्च करण्यात डॉ. संगीता देशमुख यांना अपयश आले. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या निधीच्या खर्चाबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याकडे विचारणा केली होती. त्यानंतर, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत आरोग्य विभागाच्या कामकाजात त्रुटी आणि निधी नियोजनाचा अभाव दिसून आला.
यासोबतच, डॉ. देशमुख यांच्याविरुद्ध नागरिकांच्या अनेक गंभीर तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या सर्व बाबींचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी शासनाकडे पाठवून निलंबनाचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९’ अंतर्गत ही कडक कारवाई केली आहे.
निलंबनाचे स्वरूप आणि अटी :
शासनाच्या आदेशानुसार, डॉ. संगीता देशमुख यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय परभणी जिल्हा रुग्णालय हे निश्चित करण्यात आले असून, त्यांना परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच, या काळात त्यांना कोणताही खासगी व्यवसाय किंवा नोकरी स्वीकारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
आरोग्य विभागात ‘धस्ती’चे वातावरण :
जिल्ह्यातील एका वरिष्ठ श्रेणीच्या अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची गाज पडल्याने आरोग्य विभागातील इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांसाठी हा एक स्पष्ट इशारा मानला जात आहे. “जर अधिकारी किंवा कर्मचारी जनतेला सेवा देण्यास टाळाटाळ करत असतील किंवा कर्तव्यात कसूर करत असतील, तर त्यांच्यावर अशीच कारवाई केली जाईल,” असा कडक संदेश या निमित्ताने प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्याच्या आरोग्य वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू असून, पुढील विभागीय चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.