रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अभिवादन
श्रीगोंदा (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ‘रयत माऊली’ सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा पुण्यतिथी सोहळा बुधवारी, १८ मार्च २०२६ रोजी अत्यंत सात्त्विक आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यात आपले सर्वस्व अर्पण
करणाऱ्या माऊलींच्या त्यागाचे स्मरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी रयत माऊलींच्या जीवनातील संघर्षावर प्रकाश टाकला. स्वावलंबन आणि समतेचा संदेश देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांनी स्वतःचे दागिने विकून गरीब विद्यार्थ्यांच्या भोजनाची सोय केली, हा इतिहास आजही प्रत्येकासाठी आदर्श असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य डॉ. नितीन थोरात, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम कानडे व सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.
प्रतिनिधी – बाळासाहेब राजेंद्र गांगुर्डे