April 3, 2026

“मिशन कर्मयोगी अंतर्गत डिजिटल प्रशिक्षणावर भर – विभागीय आयुक्तांचे आवाहन”

कर्मयोगी भारत पोर्टलवरील अधिकाधिक अभ्यासक्रम पूर्ण करावेत- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना सन्मानित करण्यात येणार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) दि. २:
भारत सरकार, क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातही ‘महा- साधना सप्ताह’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे विभागातील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपली कार्यक्षमता वाढविणे, तंत्रज्ञानाची सवय आत्मसात करत प्रत्यक्ष कामकाजात वापर करणे आदींसाठी ‘iGOT कर्मयोगी भारत’ पोर्टलवर लॉग इन करुन किमान ४ तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. महा-साधना सप्ताह कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना ‘TECH-वारी 2.0’ मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले असून राज्यांनाही तशा सूचना दिल्या आहेत. साधना सप्ताह हा iGOT कर्मयोगी भारत अंतर्गत राबविला जाणारा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हा उपक्रम ‘मिशन कर्मयोगी’चा एक भाग असून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आयोजित केला जातो. एक आठवडाभर आयोजित केला जाणारा हा उपक्रम पूर्णपणे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे. कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महासाधना सप्ताहात सहभाग नोंदविणे गरजेचे असेल.

आपली कार्यक्षमता वाढविणे, डिजिटल गव्हर्नन्स आणि आपल्या शासकीय दैनंदिन कामकाजासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करणे, सतत नवीन शिकणे, स्वत:ला अद्ययावत ठेवणे, वेळ व्यवस्थापन, निर्णयक्षमता वाढविणे, विविध कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोजकांचा (एआय ॲप्स) कामकाजात वापर करून डिजिटल सक्षमता वाढविणे आदी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात सहभागी होत अभ्यासक्रम पूर्ण करावेत. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनीही राज्यातील सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत असे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

महा-साधना सप्ताहात अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे काम सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करणार असल्याने कामकाजावर परिणाम न होता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कौशल्यवृद्धी होण्यास मदत होणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे ३ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यास ‘एआय दक्ष’ बॅज आणि मार्केटप्लेस वरील विस्तारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यास ‘कर्मयोगी उत्कर्ष’ बॅज देण्यात येणार आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुरस्कृत करण्यात येणार आहे. शासकीय कामकाजाची गती आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.

Written by

Suresh Shankar Jadhav

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION