April 8, 2026

वानाडोंगरी हादरलं! माजी नगराध्यक्षांच्या पती व मुलांकडून दिवसाढवळ्या हल्ला व लूट

*वानाडोंगरी हादरलं! माजी नगराध्यक्षांच्या पती व मुलांकडून दिवसाढवळ्या हल्ला व लूट*

हिंगणा : हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना उघडकीस आली आहे. सेवानिवृत्त सैनिक गोपाल तुकाराम ठाकरे (वय अंदाजे ५० वर्ष) यांच्यावर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला करून लूट करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशन, नागपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी आरोपी सतीश भाऊराव शाहाकार, त्याचा मुलगा सागर सतीश शाहाकार आणि स्वप्नील सतीश शाहाकार यांनी जुना वाद उकरून काढत फिर्यादीला घराजवळ अडवले. “मारून टाकतो” अशी धमकी देत त्यांना खाली पाडून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.
हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन, मोबाईल आणि चष्मा जबरदस्तीने हिसकावून घटनास्थळा वरून पलायन केले. जखमी अवस्थेत ठाकरे यांना तातडीने रुग्णालयात उपचार करण्यात आले असून अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम २९६, ११५(१), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी सतीश शाहाकार याच्यावर यापूर्वी फसवणुकीचा (४२०) गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे, तर स्वप्नील शाहाकार याच्यावरही अ‍ॅट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याचे समजते.

दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे वानाडोंगरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिस प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे.

*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION