March 7, 2026

कर्करोगाविरुद्ध संरक्षणाची लस; बिलोलीत १४ वर्षांच्या मुलींसाठी विशेष लसीकरण मोहीम

अमरदीप दगडे(जिल्हा प्रतिनिधी): बिलोली:
महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला असून बिलोली तालुक्यात ही मोहीम दि. ८ मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणपत वाडेकर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. माजीद शेख यांच्या नियोजनातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत १४ ते १५ वयोगटातील (१४ वर्षे पूर्ण केलेल्या) सर्व मुलींना ‘क्वाड्रिवॅलेंट’ एचपीव्ही लसीचा एकच डोस देण्यात येणार असून तो कर्करोगापासून संरक्षणासाठी पुरेसा आहे. हे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणार आहे.
लसीकरणासाठी पालकांना U-WIN पोर्टलवर नोंदणी करता येणार असून लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊनही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून सुमारे ९९.७ टक्के प्रकरणे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) संसर्गामुळे होतात. प्रतिबंधात्मक लस घेतल्यास या आजारापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते.
लसीकरणानंतर ३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक असून काही वेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी थोडे दुखणे यासारखी किरकोळ लक्षणे दिसू शकतात, जी दोन ते तीन दिवसांत आपोआप बरी होतात. त्यामुळे १४ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन समुदाय आरोग्य अधिकारी हणमंत आनंदराव साखरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी किंवा आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधावा.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INdian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION