“देशभरातील ITI मध्ये AI कोर्सेस लवकर सुरू करा! खासदार डॉ.अजित गोपछडे यांची केंद्राला ठाम मागणी”
अमरदीप दगडे (नांदेड जिल्हा प्रतिनिधी):
राज्यसभेत काल खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत देशातील युवकांच्या भविष्यासंदर्भात मोठी मागणी केली. “PM सेतू योजना” सध्या महाराष्ट्रातील नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांपुरती मर्यादित असून ती राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही विस्तारली जावी का, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला.
यासोबतच त्यांनी देशातील सर्व ITI महाविद्यालयांमध्ये सध्याच्या युगाला साजेसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित अत्याधुनिक कोर्सेस सुरू करण्याची जोरदार मागणी केली. युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाल्यास रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री Jayant Chaudhary यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून आधीच अनेक ITI मध्ये आधुनिक कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये –
👉 AI Programming Assistant
👉 Basics of Artificial Intelligence
👉 Basics of Cyber Security
👉 Introduction to Artificial Intelligence
अशा महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
राज्यमंत्री चौधरी यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकारांकडून प्रस्ताव आल्यास संबंधित ITI महाविद्यालयांमध्ये AI व इतर आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित कोर्सेस सुरू करण्यास केंद्र सरकार पूर्णपणे तयार आहे.
या सकारात्मक भूमिकेमुळे आता ग्रामीण भागातील ITI विद्यार्थ्यांसाठीही AI आणि नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर घडवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात ग्रामीण युवकांना उच्च दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.