April 15, 2026

कोंडवाड्यात ‘डमी’ कारवाई ?पिंजऱ्यात कैद श्वान, फोटोसाठी रंगरंगोटी – नगरपरिषदेवर संशय!

कोंडवाड्यात ‘डमी’ कारवाई ?पिंजऱ्यात कैद श्वान, फोटोसाठी रंगरंगोटी – नगरपरिषदेवर संशय!

प्राणीप्रेमींचा पत्रकार परिषदेतून आरोप; केवळ फोटो-लाईव्ह व्हिडिओसाठी श्वान आणल्याचा दावा, सखोल चौकशीची मागणी

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : भंडारा नगरपालिकेने नसबंदीच्या नावावर काही मोजक्या आणि खाजगी कुत्र्यांना आणून शासनासमोर केवळ कारवाईचा दिखावा करण्यात आल्याचा आरोप शक्ती अँड पॉस संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा माहुले यांनी केला आहे. सुरेखा माहुले यांनी पत्रकार परिषदेतून नगरपरिषदेवर शासनाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नगर परिषदेच्या उदासीन धोरणामुळे निर्बिजीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत नसून, उलट शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. माहुले यांनी सांगितले की, १० एप्रील शुक्रवारला शहरातील कोंडवाड्यात काही श्वानांना पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच प्राणीप्रेमींनी घटनास्थळी भेट दिली. मात्र तेथील परिस्थिती संशयास्पद असल्याचे दिसून आले. कोंडवाड्यात केवळ पाच कुत्र्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. तर कोंडवाड्यातील दोन खोल्यांच्या भिंतींवर घाईघाईने सफेदीचे काम सुरू होते. यावेळी चुन्याचे डाग कुत्र्यांवरही पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या संदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, “आज एका दिवसासाठीच कुत्रे आणले असून, त्यांचे फोटो व लाईव्ह व्हिडिओ काढून केंद्राला पाठवायचे आहेत,” असे उत्तर मिळाल्याचा दावा त्यांनी केला. आणि हेच कारण त्यांनी त्या पाळीव कुत्र्याच्या मालकाला सांगितले होते. माहुले यांच्या मते ही कुत्री काही ओळखीच्या व्यक्तींकडून तात्पुरती आणण्यात आली होती. शहरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री असताना मोजक्याच कुत्र्यांना पकडण्यामागील हेतू काय? पाळीव कुत्र्यांनाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले का? भिंतींच्या सफेदीचा आणि या कारवाईचा संबंध काय? फोटो व व्हिडिओ पाठवण्यामागील उद्देश काय? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
प्राणीप्रेमींचा आरोप आहे की, नगरपरिषदेकडून केंद्र शासनाला दिशाभूल करणारी माहिती तसेच फोटो, व्हिडिओ सादर करून भटक्या कुत्र्यांसाठी काम केल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे आर्थिक लाभ मिळवण्याचा हेतू असू शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.
याबाबत विचारणा करण्यासाठी नगरपालिकेचे प्रशांत मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की असा कोणताही प्रकार घडलेला नाही काही खाजगी कुत्र्यांबाबत तक्रारी असल्यामुळे त्यांना काही वेळासाठी कोंडवाड्यात आणण्यात आले होते. नसबंदी किंवा अशा कुठल्याही कारणासाठी भटके कुत्र्यांना आणलेले नव्हते. अन्यथा, या मुक्या प्राण्यांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
आज रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला शक्ती अँड पॉस संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा माहुले, प्राणी प्रेमीऋचा सेलोकर, माधुरी माटे आणि डॉ. राजेंद्र शहा यांची उपस्थित होते.

*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION