महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात दि १२ ऑगष्ट २०२६ रोजी डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
श्रीगोंदा (प्रतिनिधी): रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती तसेच ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश साळवे, प्रमुख पाहुणे श्रीकांत थोरात आणि ग्रंथपाल यशोदा लबडे यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मुख्य वक्त्यांनी डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. त्यांनी मांडलेली ग्रंथालय शास्त्राची पंचसूत्री (Five Laws of Library Science) आजही जगभरातील ग्रंथालयांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगण्यात आले.
डिजिटल युगातही पुस्तके आणि वाचनाचे महत्त्व कायम असल्याचे सांगत प्राचार्य प्रकाश साळवे यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करून आपल्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहन अध्यक्षीय भाषणातून केले.
या निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल यशोदा लबडे यांनी केले. उपस्थितांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.