SOCIAL AWARENESS

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पाठपुराव्याला यश, जिल्हाध्यक्ष शरद पोवार यांच्या सामाजिक कार्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मान्यवरांकडून विशेष कौतुक

By SURESH SHANKAR JADHAV • 2026-09-17 12:09 • 3 views   Share WhatsApp Share Facebook Share X
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पाठपुराव्याला यश, जिल्हाध्यक्ष शरद पोवार यांच्या सामाजिक कार्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मान्यवरांकडून विशेष कौतुक

मुडशिंगी येथे शेतकऱ्यांसाठी विशेष कॅम्प; पीएम-किसानसह विविध योजनांबाबत मार्गदर्शन

हातकणंगले (प्रतिनिधी): शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. शरद धोंडीराम पोवार यांच्या पाठपुराव्यातून मौजे मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथे बुधवार, दि. ०२ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शेतकरी कॅम्प आयोजित करण्यात आला.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेतील ई-केवायसी, आधार संलग्नीकरण, बँक खात्याशी संबंधित तांत्रिक अडचणी, प्रलंबित हप्ते तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व आवश्यक मदत देण्यासाठी हा कॅम्प घेण्यात आला.

या संदर्भात जिल्हाध्यक्ष शरद पोवार यांनी तालुका कृषी विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर तालुका प्रशासनाच्या माध्यमातून मुडशिंगी येथे शेतकऱ्यांसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला.

या शिबिरास पंचायत समिती सदस्या सौ. मीनल राजू मगदूम, गावाचे सरपंच श्री. गजानन रामचंद्र जाधव, पोलीस पाटील श्री. परिक्षीत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री. शिवाजी भोसले आणि तलाठी सौ. अश्विनी मगदूम यांची उपस्थिती होती.

तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने, मंडळ कृषी अधिकारी रमेश परीट, उप कृषी अधिकारी शिवानंद शिरढोणे, कृषी सेवक स्नेहल पुडके, आत्मा एटीएम वसीम मुल्ला आणि पीएम-किसान तंत्र सहायक गणेश कदम यांनी शिबिरात सहभागी होत शेतकऱ्यांच्या विविध अडचणींबाबत मार्गदर्शन केले.

या उपक्रमासाठी सर्व सेवा केंद्र, मुडशिंगीचे श्री. राजाराम चौगुले आणि श्री. प्रशांत पाटील यांनी तांत्रिक सहकार्य केले.

शासकीय योजनांशी संबंधित अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

या उपक्रमाबद्दल पंचायत समिती सदस्या सौ. मीनल मगदूम आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे आयोजकांनी सांगितले. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या प्रेरणेने हातकणंगले तालुकाध्यक्ष श्री. सुरेश शंकर जाधव यांनी महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष शरद पोवार यांचे अभिनंदन केले.

SURESH SHANKAR JADHAV 0 followers