REGIONAL NEWS

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान द्या कागल तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याचीही मागणी; पंधरा दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

By SAMEER JEEVANRAO KATAKE • 2026-09-29 14:14 • 7 views   Share WhatsApp Share Facebook Share X
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान द्या  कागल तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याचीही मागणी; पंधरा दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान द्या

कागल तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याचीही मागणी; पंधरा दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर , प्रतिनिधी :


नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने द्यावे, तसेच कागल तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, या मागणीसाठी मुरगूड परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने कागल तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.

यंदाच्या हंगामात पाऊस, शेतीमालाचे दर, वाढता उत्पादन खर्च आणि विविध नैसर्गिक अडचणींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ तातडीने मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

तसेच कागल तालुक्यातील शेतीवर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करून तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना विविध सवलती व मदत मिळणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या मागण्यांवर प्रशासनाने गांभीर्याने विचार करून पंधरा दिवसांच्या आत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी समीर गोरूले, अनिल पाटील, तानाजी गोरूले, भैरू इंदलकर, विश्वास शेणवी, बाळासो शेणवी, सदाशिव भारमल, बाळासो भारमल, चंद्रकांत हळकर यांच्यासह मुरगूड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

##शेतकरीप्रश्न #कागलतालुका
SAMEER JEEVANRAO KATAKE 1 follower