रोठा येथील चिमुकलीच्या हत्येप्रकरणी संताप; आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी
रोठा येथील चिमुकलीच्या हत्येप्रकरणी संताप; आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी
वर्धा | प्रतिनिधी : अमर पठारे
वर्धा जिल्ह्यातील रोठा येथे अल्पवयीन चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेचा निषेध नोंदवत विविध सामाजिक संघटनांनी दोषी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधीमंडळाने पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत न्याय मिळवून देण्यासाठी संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास दिला.
यानंतर प्रतिनिधीमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सदर निवेदन मा. मुख्यमंत्री तसेच मा. पालकमंत्री, वर्धा यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले. या प्रकरणाचा खटला फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस नरसापूर प्रकरणाप्रमाणे फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
या आंदोलनात युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना, अखिल भारतीय मराठा महिला आघाडी आणि संकल्प महिला मंच यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी वर्धा जिल्हाध्यक्ष प्रतिभा वाळके, जिल्हा उपाध्यक्ष माया वावरे, जिल्हा कार्याध्यक्ष रंजना जरोदे, जिल्हा संघटिका माधुरी वाघाडे, जिल्हा सहसंघटिका शालिनी गौरे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थितांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदे प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
— प्रतिनिधी : अमर पठारे