भंडारा, प्रतिनिधी:
धान खरेदीची मर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने १६ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला Communist Party of India (भाकप) आणि All India Trade Union Congress (आयटक) यांनी पाठिंबा दर्शविला असून सक्रिय सहभागही नोंदविला आहे.
भंडारा जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष कॉ. माधवराव बांते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. या वेळी भाकप व आयटकचे जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके, कॉ. माणिकराव कुकडकर, जिल्हा कौन्सिल सदस्य कॉ. भगवान मेश्राम, तसेच तालुका सचिव कॉ. गजानन पाचे आणि कॉ. ताराचंद देशमुख यांसह इतर कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की, नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात यावे. केंद्र सरकारकडून खरेदी मर्यादा वाढविण्यात अडचण असल्यास राज्य सरकारने हस्तक्षेप करून खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार १६ एप्रिल रोजी भंडारा, १७ एप्रिल पवनी, १८ एप्रिल भंडारा, १९ एप्रिल लाखनी व मोहाडी, २० एप्रिल लाखांदूर व मोहाडी, २१ एप्रिल साकोली आणि २२ एप्रिल तुमसर येथे आंदोलन केले जाणार आहे. तसेच तहसील स्तरावरही मोर्चे व निदर्शने आयोजित करण्याची माहिती देण्यात आली.
या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.