May 15, 2026

दहावीच्या निकालात बिलोली तालुक्याचा झेंडा; ९२.२८% निकालासह जिल्ह्यात प्रथम!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या निकालात बिलोली तालुक्याने नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक निकालाची नोंद करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुक्याचा एकूण निकाल तब्बल ९२.२८ टक्के लागला असून, या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात बिलोलीचे नाव उंचावले आहे. यावर्षी राज्य शासनाने राबवलेल्या ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा आणि भरारी पथकांच्या कडक देखरेखीखाली ही परीक्षा पार पडली होती. अशा पारदर्शक वातावरणात विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या खऱ्या गुणवत्तेची साक्ष देणारे आहे. या परीक्षेची निकालाची ठळक वैशिष्ट्ये पाहता, तालुक्यातून परीक्षेसाठी २१०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २०७४ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते आणि त्यामधून एकूण १९१४ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये श्रेणीनिहाय कमालीचे यश पाहायला मिळाले असून, ५९० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction) मिळवले आहे, ६२३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५०२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर १९९ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील तब्बल ११ शाळांनी आपली शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.
​ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा आधुनिक स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून एक मोठी भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि मुख्याध्यापकांचे काटेकोर नियोजन या चतुःसूत्रीमुळेच हे यशाचे शिखर गाठणे शक्य झाले, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. बिलोली तालुक्याने मिळवलेल्या या उज्ज्वल आणि ऐतिहासिक यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी बी. एम. पाटील यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले आहे. तसेच विस्तार अधिकारी जयवंतराव काळे, यादवराव कौटकर , विषय तज्ञ राठोड सर, हलगरे सर, अनासपुरे मॅडम,आणि तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या अभूतपूर्व यशाने बिलोली तालुक्याने शिक्षण क्षेत्रात संपूर्ण जिल्ह्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP ASHOKARAO DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION