May 1, 2026

स्वगणना मोहिमेला १ मेपासून प्रारंभ; कोल्हापूरमध्ये जनजागृतीला सुरुवात

कोल्हापूर, दि. १ (प्रतिनिधी): भारतातील जनगणना प्रक्रियेअंतर्गत प्रस्तावित डिजिटल उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मेपासून जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला.

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार शाहू छत्रपती यांनी ‘स्वगणना’ उपक्रमांतर्गत स्वतःची माहिती नोंदवून या मोहिमेत सहभाग नोंदविला.

या उपक्रमाद्वारे नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी अधिकृत पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून, १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना माहिती भरता येणार आहे.

प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ‘घरांची यादी आणि गृहनिर्माण’ या विषयांवर माहिती संकलन केले जाणार आहे. घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि कुटुंबाशी संबंधित मूलभूत माहिती गोळा केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अधिकृत पोर्टलवरच माहिती भरावी तसेच कोणत्याही अनधिकृत लिंकवर विश्वास ठेवू नये किंवा वैयक्तिक माहिती आणि ओटीपी शेअर करू नये.

ही प्रक्रिया नि:शुल्क असून, भविष्यातील नियोजनासाठी आवश्यक डेटा संकलनात या उपक्रमाचा उपयोग होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Written by

Suresh Shankar Jadhav

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION