May 20, 2026

गरिबीशी झुंज देत बुरुड कामगाराच्या मुलाची मोठी भरारी; मनोज गुडमलवार यांची CGST मध्ये हवालदार पदावर निवड

बिलोली, वार्ताहर
———————–
जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांच्या कष्टाच्या जोरावर गावातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने उल्लेखनीय यश संपादन केल्याची प्रेरणादायी घटना कासराळी येथे घडली आहे. येथील मनोज मोहनराव गुडमलवार यांची स्टाफ सिलेक्शन आयोगामार्फत केंद्रीय वस्तू व सेवा कर व सीमाशुल्क विभागात (CGST) हवालदार पदावर निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मनोज यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, कासराळी येथे पूर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण लाल बहादूर शास्त्री विद्यालय, कासराळी येथे घेतले. उच्च माध्यमिक शिक्षण सैनिकी विद्यालय, सगरोळी येथे पूर्ण करून पुढील पदवी शिक्षण सायन्स कॉलेज, नांदेड येथे घेतले. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मेहनत, शिस्त आणि अभ्यासाची आवड कायम जपली.
मनोज हा लहानपणापासूनच अत्यंत हुशार व जिद्दी स्वभावाचा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्याने कधीही परिस्थितीपुढे हार मानली नाही. त्याचे वडील मोहनराव गुडमलवार हे पारंपरिक बुरुड काम करून सुप, टोपल्या, ताटवे तयार करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. दिवस-रात्र मेहनत करून मुलाला शिकविण्याचे स्वप्न त्यांनी जपले होते. आर्थिक अडचणी, संकटे आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही कमी पडू दिली नाही.
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत मनोजने अखेर केंद्रीय वस्तू व सेवा कर व सीमाशुल्क विभागात हवालदार पद मिळवून आपल्या कुटुंबाचे, गावाचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. मनोजच्या या यशामुळे कासराळी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तरुणांसाठी तो प्रेरणास्थान ठरत आहे.
मनोज गुडमलवार यांच्या निवडीबद्दल जि. प. सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, खरेदी विक्री संघाचे सभापती अरविंद ठक्करवाड, आध्यत्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र रेड्डी तोटावाड, शंकर गंगुलवार, भाऊसाहेब बनबरे, ग्रामस्थ, शिक्षकवृंद, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व राजकीय स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
मनोजचे यश हे ग्रामीण भागातील संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP ASHOKARAO DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION