मिलिंद विद्यालयाची यशाची परंपरा कायम; SSC परीक्षेत दत्तप्रसाद गंगुलवार कुंडलवाडी केंद्रात प्रथम
कुंडलवाडी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने काल जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात मिलिंद विद्यालय, कुंडलवाडीने आपल्या देदीप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. या निकालामध्ये विद्यालयाचा विद्यार्थी दत्तप्रसाद प्रकाश गंगुलवार याने ९५.४०% गुण प्राप्त करून विद्यालयात आणि संपूर्ण कुंडलवाडी केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्याच्या पाठोपाठ आर्यन एकनाथ शारवाले याने ९२.२०% गुणांसह विद्यालयात द्वितीय, तर कुंडलवाडी केंद्रात तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच कु. श्रीजा श्रीनिवास नरावाड हिने ९०.८०% गुण मिळवून विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावला.
यंदाच्या बोर्ड परीक्षेसाठी मिलिंद विद्यालयातून एकूण १३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी विद्यालयाचा एकूण निकाल ९४.९६% इतका लागला आहे. विद्यार्थ्यांच्या श्रेणीनिहाय निकालाचा विचार करता, ३१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश संपादन केले असून, ३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ४६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद मानले जात आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री कुणाल लोहगावकर साहेब, संचालक विजयकुमार लोहगावकर सर, मिलिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक एच. एन. पांचाळ आणि मिलिंद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आर. डी. नरावाड , मिलिंद विद्यालय व मिलिंद प्रा. शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, पालकवर्गातूनही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मोठे कौतुक केले जात आहे. आगामी काळात या विद्यार्थ्यांनी अशीच प्रगती करावी, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.