पंचगंगेपासून कृष्णेपर्यंत : स्थानिक मासे कुठे हरवत आहेत? कोल्हापूरच्या मत्स्य जैवविविधतेचे बदलते चित्र; 2024च्या इन्व्हेंटरीला 2026च्या परिस्थितीची जोड
पंचगंगेपासून कृष्णेपर्यंत : स्थानिक मासे कुठे हरवत आहेत?
कोल्हापूरच्या मत्स्य जैवविविधतेचे बदलते चित्र; 2024च्या इन्व्हेंटरीला 2026च्या परिस्थितीची जोड
कोल्हापूर : प्रतिनिधी | समीर कटके
पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा आणि तुळशीसह नद्या व जलाशयांनी समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील मत्स्य जैवविविधतेसमोर बदलत्या जलपरिसंस्थेचे आव्हान निर्माण झाले आहे. जून 2024 मध्ये झालेल्या "कोल्हापूर जिल्ह्यातील मत्स्यजीवसृष्टीची सूची- सर्वेक्षण"
या संशोधनात जिल्ह्यातील 110 माशांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली. त्यापैकी 10 विदेशी आणि 3 ट्रान्सप्लांटेड म्हणजे स्थलांतरित किंवा व्यावसायिक हेतूसाठी आणून सोडलेल्या प्रजाती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उजनी जलाशय परिसरात तिलापिया, सकरमाउथ आणि थाय मांगूरसारख्या आक्रमक प्रजातींच्या वाढत्या संख्येविरोधात मच्छीमारांच्या सहभागातून प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिक प्रकर्षाने पुढे आला आहे या प्रजातींचे प्रमाण वाढल्याने स्थानिक माशांच्या उपलब्धतेबरोबरच पारंपरिक मत्स्यव्यवसायावरही परिणाम होत असल्याचे अहवालात नमूद आहे. सकरमाउथची उपस्थिती सह्याद्रीत उगम पावणाऱ्या भीमा नदीच्या वरच्या भागात आणि कृष्णा खोऱ्यातही नोंदवली गेल्याचे सांगण्यात आले आहे.
2024ची कोल्हापूर इन्व्हेंटरी ही जुन्या प्रजातींची यादी तर आहेच तसेच 2026मध्ये मत्स्य पर्यावरणामध्ये झालेला बदल मोजण्यासाठी महत्त्वाचा संदर्भ आहे. मात्र विदेशी प्रजातींची उपस्थितीने स्थानिक प्रजातींचा ऱ्हास होत आहे, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. प्रदूषण, अधिवासातील बदल, अतिमासेमारी आणि नदीप्रवाहातील मानवी हस्तक्षेप यांचाही स्वतंत्र अभ्यास आवश्यक आहे. भारतातील संशोधनानुसार खुल्या जलस्रोतांमध्ये स्थिरावलेल्या विदेशी माशांचे निर्मूलन अत्यंत कठीण असू शकते.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात 2024च्या 110 प्रजातींच्या जीवनमानाची 2026मध्ये नव्याने तपासणी, नदी-जलाशयनिहाय मत्स्य सर्वेक्षण आणि स्थानिक मच्छीमारांच्या अनुभवांची शास्त्रीय नोंद करण्याची गरज व्यक्त होत आहे.
जलाशय आणि नदीप्रणालीमध्ये परकीय माशांच्या प्रजाती स्थिरावून त्यांची संख्या वाढल्यास स्थानिक मत्स्यप्रजातींवर अन्न, अधिवास आणि प्रजननस्थळांसाठी स्पर्धेचा दबाव निर्माण होऊ शकतो. तिलापिया, कॉमन कार्प, आफ्रिकन कॅटफिश तसेच सकरमाउथ यांसारख्या प्रजाती काही परिस्थितींमध्ये वेगाने वाढण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे स्थानिक माशांना उपलब्ध असलेले अन्न, सुरक्षित अधिवास आणि प्रजननक्षेत्र यावर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः पश्चिम घाटातील मर्यादित भौगोलिक क्षेत्रात आढळणाऱ्या स्थानिक प्रजातींसाठी हा प्रश्न अधिक संवेदनशील आहे. मात्र एखाद्या जलाशयात स्थानिक माशांची संख्या कमी होण्याचे कारण केवळ परकीय प्रजाती आहेत, असेही नाही. जलप्रदूषण, अधिवासातील बदल, अतिमासेमारी, नदीप्रवाहातील बदल आणि मानवी हस्तक्षेप हेही महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे 2024 मध्ये नोंदविलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 110 माशांच्या प्रजातींच्या आधारभूत माहितीनंतर 2026 मध्ये त्याच नदी व जलाशयांमध्ये पुन्हा सर्वेक्षण करून स्थानिक आणि परकीय प्रजातींच्या संख्येतील बदल तपासणे आवश्यक ठरते. अशा तुलनात्मक अभ्यासातूनच परकीय प्रजातींचा स्थानिक मत्स्यसंपदेवर नेमका किती परिणाम होत आहे, याचे शास्त्रीय चित्र स्पष्ट होऊ शकते.