LATEST NEWS

उत्सव हवा, गोंगाट नको; कोल्हापुरात ध्वनीप्रदूषणाविरोधात सजग भूमिका

By SAMEER JEEVANRAO KATAKE • 2026-09-14 03:47 • 23 views   Share WhatsApp Share Facebook Share X
उत्सव हवा, गोंगाट नको; कोल्हापुरात ध्वनीप्रदूषणाविरोधात सजग भूमिका

उत्सव हवा, गोंगाट नको; कोल्हापुरात ध्वनीप्रदूषणाविरोधात सजग भूमिका

कोल्हापूर : प्रतिनिधी
समीर कटके

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘उत्सव हवा, गोंगाट नको’ हा संदेश यंदा ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नाला केंद्रस्थानी आणत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण नियंत्रणाबाबत घालून दिलेल्या नियमांनुसार लाऊडस्पीकर व सार्वजनिक ध्वनिवर्धक यंत्रणेसाठी परवानगी आवश्यक असून रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत त्यांच्या वापरावर निर्बंध आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करण्याची भूमिका घेत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूर पोलिसांनीही गणेश मंडळांना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परवानगीशिवाय किंवा नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनियंत्रणा वापरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी काही मिरवणुकांमध्ये ध्वनियंत्रणा व लेझरऐवजी पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, पुण्यात ‘गोंगाट नको’ या भूमिकेतून सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी डीजे व कर्णकर्कश ध्वनीविरोधात नागरिकांची चळवळ उभी केली. ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या बापट यांच्यावर ३ सप्टेंबर रोजी पुण्यातील टिळक रोड परिसरात माध्यमांशी संवाद साधत असताना हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ध्वनीप्रदूषणाविरोधातील आंदोलन आणि नागरिकांच्या शांततेच्या अधिकाराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला.

पुण्यातील ‘उत्सव हवा, गोंगाट नको’ या जनजागृती उपक्रमालाही समाजमाध्यमांवर प्रतिसाद मिळत आहे.

गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव आहे. त्यामुळे उत्सवाची ऊर्जा कायम ठेवताना रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या शांततेच्या अधिकाराचाही विचार करण्याची गरज आहे. कोल्हापुरातील गणेश मंडळे, नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातून ‘भक्तीचा उत्सव, ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरण’ हा आदर्श निर्माण होऊ शकतो.

##कोल्हापूर #ध्वनिप्रदूषण
SAMEER JEEVANRAO KATAKE 0 followers