ठाण्यात धावणार प्री-पेड रिक्षा
ठाण्यात धावणार प्री-पेड रिक्षा; प्रवाशांची लूट आणि वादाला बसणार आळा!
ठाणे स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांची अरेरावी, मनमानी भाडे आकारणी आणि प्रवाशांना होणारा त्रास यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारपर्यंत प्री-पेड रिक्षा योजनेला राज्य शासनाची मंजुरी मिळणार असून, लवकरच ठाणे शहरात प्री-पेड रिक्षा सेवा सुरू होणार आहे.
या व्यवस्थेमुळे स्टेशनवर उतरलेल्या प्रवाशाला आधीच आपल्या गंतव्यस्थळाचे निश्चित भाडे कळेल. भाडे भरल्यानंतर रिक्षा उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे भाड्यावरून होणारी घासाघीस, मनमानी दर, प्रवाशांना नकार देणे आणि गंतव्यस्थळी पोहोचल्यानंतर होणारे वाद यांना आळा बसेल. ठाणेकरांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक रिक्षा सेवा मिळेल.
मागील आठवड्यात ठाणे स्टेशन परिसरातील वाहतूक समस्यांची पाहणी केल्यानंतर आज शासकीय विश्रामगृहात आरटीओ, वाहतूक शाखा आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत ठाणे शहरातील विविध वाहतूक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून त्यावर तातडीच्या उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात आले.
स्टेशन परिसरातील काही रिक्षाचालकांची मुजोरी आणि अरेरावी रोखण्यासाठी गर्दीच्या सकाळी व संध्याकाळच्या वेळेत आरटीओचे दोन अधिकारी प्रत्येकी चार तास स्टेशन परिसरात उपस्थित राहणार आहेत. यामुळे रिक्षाचालकांच्या गैरवर्तनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि वाहतूकही सुरळीत राहील.
तसेच वागळे, कोपरी, इंदिरानगर यांसह शहरातील विविध भागांतील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. गर्दीच्या चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्याबाबतही पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
ठाणेकरांना रोजच्या प्रवासात त्रास होऊ नये, प्रवाशांची अडवणूक होऊ नये आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
ठाणेकरांच्या प्रवासाला सुरक्षितता, सुविधा आणि सन्मान मिळालाच पाहिजे.
या बैठकीस वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नगरसेवक भरत चव्हाण, अमित सरय्या, अनिता यादव, तसेच जयेंद्र कोळी, विशाल वाघ आदी उपस्थित होते.