पीएमश्री टॅलेंट सर्च परीक्षेतून विद्यार्थ्यांना नवी दिशा; गुणवंतांचा सत्कार व नवोदय-शिष्यवृत्तीसाठी मोफत मार्गदर्शन
उदगीर (तोंडचिर प्रतिनिधी):
विद्यार्थी व पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळांबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच मराठी शाळांचे अस्तित्व अधिक बळकट व्हावे, या उद्देशाने पीएमश्री जिल्हा परिषद शाळा तोंडचिरतर्फे एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पीएमश्री टॅलेंट सर्च परीक्षा’ दि. २४ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. बेलसकरगा, रावणगाव, तादलापूर, धोंडीहिप्परगा, शेल्हाळ आणि बामणी येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणाची ओळख करून देत त्यांच्या बौद्धिक क्षमतेला वाव देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक शाळेतून निवडल्या जाणाऱ्या पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच पालकांमध्येही शिक्षणाबाबत सकारात्मकता निर्माण होईल.
तसेच, नवोदय विद्यालय व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी उन्हाळी पूर्वतयारी वर्ग सुरू करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार तयारीची संधी उपलब्ध होणार आहे.
ग्रामपंचायतीकडून या उपक्रमाला पाठिंबा मिळाला असून, विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा उपक्रम जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास वाढवण्यासोबतच ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगासाठी सक्षम बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.