समस्त कक्कय्या समाज महासंघाचे महाअधिवेशन उत्साहात संपन्न; उपवर्गीकरणाला विरोधाचा ठराव एकमताने मंजूर
समस्त कक्कय्या समाज महासंघाचे महाअधिवेशन उत्साहात संपन्न; उपवर्गीकरणाला विरोधाचा ठराव एकमताने मंजूर
मुंबई, (दत्ता खंदारे): समस्त कक्कय्या समाज महासंघाचे भव्य महाअधिवेशन रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी मनोहर जोशी विद्यालय प्रांगण, धारावी डेपो, पी.एम.जी.पी. संकुलजवळ, धारावी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाले.
महासंघाचे अध्यक्ष श्री. निवृत्ती सावळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महाअधिवेशनाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार श्री. ज्ञानराज चौगुले, माजी आमदार श्री. धर्माजी सोनकवडे, माजी आमदार श्री. बाबुराव माने व उमरगा पंचायत समितीच्या सभापती सौ. आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत कक्कय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
प्रारंभी सरचिटणीस श्री.प्रकाश दरवेशी यांनी प्रास्ताविक केले.अध्यक्ष श्री.निवृत्ती सावळकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजातील बांधवांशी संवाद साधताना समाजातील एकजूट, शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आणि आपल्या तरुणांनी प्रगतीसाठी कसे हिरीरीने पुढे आले पाहिजे, यावर ना रामदास आठवले साहेबांनी विचार मांडून त्यांना मार्गदर्शन केले.तर सुशील कुमार शिंदे (माजी गृहमंत्री )यांनी सुद्धा या समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावे म्हूणन मी सरकारला पत्र लिहले.परंतु त्याचा विचार केला गेला नाही. सरकार बदलत राहतात. पण अजूनही वेळ गेली नाही महामंडळ नक्कीच मिळेल अशी आशा त्यांनी अधिवेशनात व्यक्त केली.
महत्त्वाचे ठराव व मागण्या:
१.उपवर्गीकरणाला विरोध: अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणामुळे समाजाचे आरक्षण धोक्यात येईल, असा इशारा देत श्री. विठ्ठल खरटमल व डॉ. रायप्पा कटके यांनी विरोधाचा ठराव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.
२.आर्थिक विकास महामंडळ: समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी कार्याध्यक्ष श्री. हनुमंत सोनवणे यांनी केली. आमदार सौ. ज्योती गायकवाड यांनी महामंडळाला पाठिंबा जाहीर केला.
३.संत कक्कय्या भवन:मुंबईत येणाऱ्या समाजबांधवांसाठी ‘संत कक्कय्या भवन’ उभारण्याची मागणी उपाध्यक्ष श्री. अशोक खरटमल यांनी केली.
४.मासिक वर्गणी:तळागाळातील गरजू बांधवांच्या मदतीसाठी दरमहा १००रुपये वर्गणी जमा करण्याचा ठराव मंजूर झाला.
मान्यवरांचे विचार:
डॉ. पी. पी. पोळ यांनी संस्थापक श्री. मारुती सदाफुले यांच्या कार्याचा गौरव केला. ज्येष्ठ साहित्यिक ना. म. शिंदे म्हणाले, “धारावी हे समाजाचे मूळ स्थान आहे. आपण आपली ओळख लपवू नये. महासंघाने ‘एक गाव, एक संघटना’ धोरण राबवून जनगणना करावी.” श्री. मुकुंद सोनटक्के यांनी, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत जाती-जातीत भांडणे लावणाऱ्यांना बळी पडू नका,” असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. निवृत्ती सावळकर म्हणाले, “समाजासाठी शेवटपर्यंत लढत राहीन. प्रत्येक जिल्ह्यात कक्कय्या भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार. उपवर्गीकरणाच्या अन्यायाविरोधात लढा उभारू.” त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
यावेळी समाजातील गुणवंतांचा समाजरत्न’व ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
अधिवेशनास केंद्रीय मंत्री श्री. रामदास आठवले, आमदार सौ.ज्योती गायकवाड, नगरसेविका सौ. अर्चनाताई शिंदे, नगरसेवक श्री. भास्कर शेट्टी, नगर सेवक जोसेफ कोळी यांच्यासह हजारो समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. शशिकांत सोनवणे* यांनी केले तर श्री. मनोज शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सांगता झाली.