गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे महामार्ग रोखला; डॉ. यशवंत लांजेवार यांच्या हस्तक्षेपानंतर ३२० अतिरिक्त सिलेंडर वाटप
भंडारा | प्रतिनिधी
भंडारा: शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी खात रोडवरील खोकरला गुर्जर गॅस एजन्सीसमोर घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दीर्घकाळापासून सिलेंडर उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांचा संताप वाढत गेला आणि परिस्थिती चिघळली.
संतप्त नागरिकांनी सिलेंडरचा वापर करून भंडारा–रामटेक महामार्ग रोखला, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच नंदगोपाल फाउंडेशनचे संस्थापक उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्याशी संपर्क साधून नागरिकांच्या समस्येबाबत माहिती दिली आणि त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
परिस्थिती गंभीर होत असल्याने भंडारा शहर पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग तसेच अतिरिक्त सुरक्षा तुकडी घटनास्थळी तैनात करण्यात आली. सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर पुरवठा विभागाने ३२० अतिरिक्त गॅस सिलेंडर वाटप करण्याचे आदेश दिले.
या निर्णयानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. नागरिकांनी तात्काळ कारवाईमुळे दिलासा व्यक्त केला.
अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर ही समस्या निर्माण झाल्याने प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, नंदगोपाल फाउंडेशनच्या वतीने आंदोलनस्थळी उपस्थित नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.