भंडारा, दि. १ मे: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने भंडारा जिल्ह्यातील गणेशपुर ग्राम पंचायत येथे नव्या पोलीस चौकीचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, पंचायत समिती सदस्य कीर्तीताई गणवीर, सरपंच विद्याताई मेहर, उपसरपंच जितेश मेहर, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, एसडीपीओ काळे, पोलीस निरीक्षक भुसारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडाळे, रविंद्र बोरकर आणि भंडारा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गणेशपुर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी या पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली आहे. कोरंभी बायपास हायवे परिसरात वाढत्या वर्दळीमुळे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ही चौकी महत्त्वाची ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या चौकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी कार्यरत राहणार असून, परिसरातील नागरिकांना त्वरित पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
यावेळी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.