PRESS RELEASE

राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनकडून सन २०२५-२६ साठी गौरव; ५०१ ते १००० कोटी ठेवींच्या गटातून निवड

By SAMEER JEEVANRAO KATAKE • 2026-09-29 14:11 • 7 views   Share WhatsApp Share Facebook Share X
राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार  कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनकडून सन २०२५-२६ साठी गौरव; ५०१ ते १००० कोटी ठेवींच्या गटातून निवड

राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनकडून सन २०२५-२६ साठी गौरव; ५०१ ते १००० कोटी ठेवींच्या गटातून निवड

कोल्हापूर, प्रतिनिधी :

राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक लि., कागलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनतर्फे सन २०२५-२६ साठी देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार राजे बँकेला जाहीर झाला आहे. ५०१ ते १००० कोटी रुपये ठेवी असलेल्या नागरी सहकारी बँकांच्या गटातून उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे राजे बँकेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीची आणि ग्राहकाभिमुख कामकाजाची दखल घेत मिळालेला हा पुरस्कार बँकेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विशेष म्हणजे, बँकेला आतापर्यंत मिळालेला हा २५ वा पुरस्कार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनतर्फे दरवर्षी सदस्य नागरी सहकारी बँकांच्या कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यमापन करून गटवार पद्धतीने उत्कृष्ट बँकांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. आर्थिक शिस्त, व्यवसायवाढ, ग्राहकसेवा आणि बँकिंग क्षेत्रातील कामगिरी आदी बाबींचा विचार या निवड प्रक्रियेत केला जातो.

या पुरस्काराचे वितरण बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे असोसिएशनच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे.

१००० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल

बँकेने अलीकडच्या काळात आपल्या व्यवसायवाढीबरोबरच विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून ग्राहक आणि युवा उद्योजकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून युवा उद्योजकांना कर्जपुरवठा करण्यात बँक राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी सांगितले.

सहकारमहर्षी स्वर्गीय राजेसाहेबांच्या आशीर्वादाने आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची १००० कोटी रुपयांच्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ग्राहकाभिमुख सेवेला प्राधान्य

विविध कर्ज योजनांसोबतच ग्राहकांना विनम्र, तत्पर आणि जलद सेवा देण्यावर बँकेचा सातत्याने भर राहिला आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बँकेच्या कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे बँक व्यवस्थापनाने सांगितले.

बँकेच्या या यशामध्ये संचालक मंडळाचे नियोजन, व्यवस्थापनाची प्रभावी साथ तसेच सभासद आणि ग्राहकांनी बँकेवर दाखविलेला विश्वास यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे अध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी स्पष्ट केले.

“मिळालेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार हा बँकेच्या पारदर्शक, गतिमान आणि ग्राहकाभिमुख कार्याची पावती आहे. भविष्यातही ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यावर भर राहील,” असे सौ. नवोदिता घाटगे यांनी सांगितले.

बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सभासद, ग्राहक, अधिकारी-कर्मचारी आणि हितचिंतकांकडून अभिनंदन होत आहे.

##सर्वोत्कृष्ट_बँक_पुरस्कार#राजे_विक्रमसिंह_घाटगे_बँक
SAMEER JEEVANRAO KATAKE 1 follower