राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक भागांत पावसाअभावी शेतकरी अडचणीत सापडला असून, परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
सोयाबीन, बाजरी, उडीद, ज्वारी यांसह विविध खरीप पिकांवर पावसाच्या कमतरतेचा परिणाम झाला आहे. काही भागांत पिके करपली असून किडींचा प्रादुर्भावही वाढला असल्याचे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पवार यांनी पत्रातून नऊ मागण्या केल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागात तात्काळ छावण्या सुरू कराव्यात, फळबागा वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शेतमजूर कुटुंबांनाही या संकटाचा मोठा फटका बसत असल्याने प्रत्येक शेतमजूर कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, दुष्काळी सवलती तातडीने लागू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान ५० हजारांवरून एक लाख रुपये करावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
राज्यातील पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान आणि ग्रामीण भागातील रोजगारावर होणारा परिणाम लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.