अहिल्यानगर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क), दि. 15 एप्रिल: राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, तसेच संपूर्ण मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह संबंधित पोलीस व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले की, पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. तसेच संवेदनशील व इतर मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडेल यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
#administration
#maharashtra news