May 8, 2026

समाजाचे देणे फेडणारा खरा कर्मयोगी – प.पू. डॉ. ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांचे प्रतिपादन*

अमरदीप दगडे (जिल्हा प्रतिनिधी):
सगरोळी: परोपकाराने पुण्य मिळते, तर दुसऱ्याला त्रास देणे हे महापाप आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो आणि समाजाचे उपकार जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्यावर असतात. ही जाणीव ज्याच्या मनात असते तोच खरा कर्मयोगी होय, असे प्रतिपादन प.पू. डॉ. ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांनी केले.
सगरोळी येथे २२ मार्च रोजी कर्मयोगी बाबासाहेब (के. ना.) देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू. डॉ. ज्ञानराज माणिकप्रभू महाराज, संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख आणि जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ. ज्ञानराज महाराज पुढे म्हणाले की, बाबासाहेब देशमुख यांना मी लहानपणापासून ओळखतो. ते अत्यंत साध्या स्वभावाचे होते. स्नानानंतर ते दररोज ज्ञानेश्वरीचे पठण करीत असत. ज्ञानेश्वरीचा त्यांच्या जीवनावर खोल प्रभाव होता. त्यांनी ऐश्वर्यसंपन्न जीवन न जगता समाजासाठी शैक्षणिक संस्था उभारून दीनदुबळ्यांची सेवा केली. ग्रामीण समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्याची स्मृती आणि विचारांचा वारसा जपणे हीच खरी आदरांजली ठरेल.
जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने वर्षभर विविध शैक्षणिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांची सांगता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या आवारात बाबासाहेबांच्या चित्राकृती पुतळ्याचे अनावरण माणिकप्रभू महाराजांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित नाट्यछटा सादर केली. “कर्मयोगी” या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक रोहित देशमुख यांनी केले. तर वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक संभाजी गायकवाड यांनी दिली.
संस्कृती संवर्धन मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या बाबासाहेब देशमुख यांच्या या कृतज्ञता सोहळ्यास नांदेड जिल्ह्यासह परिसरातील शिक्षणप्रेमी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, नागरिक, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद महाराज यांनी केले, तर आभार प्रदर्शन मेघाली खिरपावार यांनी केले.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP ASHOKARAO DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION