देगलूर : बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालय तालुक्यातील नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत असल्याने देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
देगलूर हे उपजिल्ह्याचे ठिकाण असूनही तालुक्यातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी बिलोली येथे जावे लागते. सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या बिलोलीपर्यंत पोहोचण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा मर्यादित असल्यामुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक आणि महिला पक्षकारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
सध्या सुरू असलेल्या अनेक प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे देगलूर तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे स्थानिक स्तरावर न्यायालय सुरू करण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.
देगलूर येथे न्यायालयासाठी आवश्यक जागेची उपलब्धता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. येथे जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागेवर नवीन इमारत उभारण्यात आलेली असल्याने पायाभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होत नाही.
या पार्श्वभूमीवर देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी धनाजी जोशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.