पोर्टलवर परिपूर्ण माहिती भरून जनगणनेच्या या राष्ट्रीय कर्तव्यात बहुमूल्य योगदान द्यावे – उपजिल्हाधिकारी गजानन गुरव
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. २२.०४.२६
देशाच्या २०२७ जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील जनगणना कामकाजाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे आणि जनगणना संचलनालयाचे जिल्हा समन्वयक तुषार पाटील उपस्थित होते.
गजानन गुरव यांनी सांगितले की, जनगणना ही देशाच्या विकास योजनांच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. नागरिकांनी पोर्टलवर परिपूर्ण आणि अचूक माहिती भरून या राष्ट्रीय कर्तव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा.
जिल्ह्यात १ मे ते १५ मे २०२६ दरम्यान नागरिकांसाठी स्वयंगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन माहिती भरावी. माहिती भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र ओळख क्रमांक मिळेल, जो सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. १६ मेनंतर प्रगणक घरभेटीवेळी हा आयडी वापरून माहिती अधिकृतरीत्या नोंदवतील.
कोल्हापूर जिल्ह्यात १३ तहसील कार्यालये, १३ नगरपालिका, १२५७ महसूल गावे आणि ४९९९ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स निश्चित करण्यात आले आहेत. तसेच ६०५४ प्रगणक आणि ९९५ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यंदाची जनगणना पूर्णतः डिजिटल असून माहिती संकलनासाठी विशेष अॅप्सचा वापर केला जाणार आहे. नागरिकांची सर्व माहिती गोपनीय व सुरक्षित ठेवली जाईल.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वयंगणनेचा लाभ घ्यावा आणि प्रगणकांना अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे.