बिलोलीच्या विजय पटणे मेमोरियल स्कूलचा एसएससी परीक्षेत १०० टक्के निकाल; तालुक्यातही मारली बाजी
बिलोली: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, येथील गांधी नगर भागातील विजय पटणे मेमोरियल स्कूलने यंदाही आपला १०० टक्के निकालाचा देदीप्यमान वारसा कायम राखला आहे. या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थिनी कु. जयश्री बालाजी बुद्धेवाड हिने ९५.६०% गुण प्राप्त करून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला, तर बिलोली तालुक्यात संयुक्त रित्या द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या पाठोपाठ कु. अश्विनी संजय शेट्टिवार हिने ९२% गुणांसह द्वितीय आणि कु. विराट राजेंद्र कुडकेकर याने ९१.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
विद्यालयातून यावर्षी एकूण ४८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत यश संपादन केले, तर १६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि ९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीसह ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई पटने, सचिव चंद्रशेखर पाटील, सहसचिव जयमाला पटने, मुख्याध्यापक गंगुलवार सर, तसेच ज्येष्ठ शिक्षक इंगळे सर, येमेकर सर, पाटील सर, शेख सर, बादेवाड सर आणि सर्व पालक वर्गाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शालेय स्तरावरील या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून विद्यालयाचे कौतुक होत आहे.