महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा येथे ग्रंथप्रदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
श्रीगोंदा (प्रतिनिधी) :
रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने दि. १६ एप्रिल २०२६ रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य ग्रंथप्रदर्शन आणि ‘यशवंत-कीर्तिवंत’ विद्यार्थी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमातून महामानवांच्या क्रांतीकारी विचारांचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बबनराव पाचपुते होते. प्रमुख अतिथी म्हणून बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुलदादा जगताप आणि महावीर पटवा उपस्थित होते. मुख्य व्याख्याते कृष्णा घोलप यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून महामानवांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “पुस्तके ही माणसाला सुसंस्कृत बनवतात आणि महापुरुषांचे विचारच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा खरा मार्ग आहेत.”
यावेळी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रशासकीय सेवेत भरारी घेणाऱ्या गुणवंतांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये राहुल दरेकर (महसूल सहाय्यक), तुषार खेतमाळीस (पी.एस.आय.) आणि कु. संगीता आढाव (अधीक्षक, शासकीय मुलींचे वसतिगृह) व इतर सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी केले. यावेळी विज्ञान विभागप्रमुख डॉ. नितीन थोरात, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सुदाम भुजबळ आणि ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. यशोदा लबडे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रो. राजाराम कानडे उपस्थित होते. प्रा.अनिल ढवळे यांनी सर्वांचे आभार मानले. या ग्रंथप्रदर्शनामध्ये महापुरुषांच्या जीवनावरील शेकडो दुर्मिळ ग्रंथ मांडण्यात आले होते, ज्याला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. महापुरुषांच्या दुर्मिळ ग्रंथांचे वाचन करण्याची संधी यावेळी उपलब्ध झाली होती. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.